कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 02:42 AM2020-01-20T02:42:27+5:302020-01-20T02:43:17+5:30
११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे.
पनवेल : जास्त परताव्याचे आमिष दाखवून व पंचवीस हजार रुपये भरून २० लाख रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून ११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचे मालक मुकरम अली अन्सारी व रेखा कांबळे यांनी वेळोवेळी नाव बदलून पंचवीस हजार रुपये भरून कर्ज देतो, असे नागरिकांना सांगितले होते. संगीता धारू राठोड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांना अली यांनी त्याचे नाव महंमदअली असे सांगितले. तर रेखा कांबळे ही त्याचे नाव मनीषा व कलिका असे सांगायच्या.
मुकरम अली अन्सारी उर्फ मोहम्मद अली अन्सारी उर्फ एमएम अशी नावे सांगून त्याने मे. अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे मालक असल्याचे तसेच या महिलेने स्वत:ची ओळख कंपनीची ग्रुप लीडर म्हणून रेखा कांबळे उर्फ मनीषा गमरे उर्फ कलिका कांबळे अशी सांगितली.
अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे हेड आॅफिस १३१, एम.जी. रोड, अमीरगंज, न्यू दिल्ली येथे असून नमूद फायनान्स कंपनीची स्विस ९९९.२४ कॅरेट गोल्ड, झुरीच, स्वित्झर्लंड येथे शाखा असल्याचे नागरिकांना सांगत असत. ही फायनान्स कंपनी २० लाख रुपयांपर्यंत पर्सनल व बिझनेस लोन देते, असे सांगून या कंपनीमध्ये सभासद होण्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये रक्कम ठेव म्हणून जमा करावी लागेल तसेच सभासदाकडून स्वीकारलेली रक्कम ते शेअर मार्केटमध्ये गुंतवितात. त्यानंतर कंपनी तत्काळ सभासद झालेल्या व्यक्तीला लाभांश म्हणून विनापरतावा २० लाख रुपयांपर्यंत पर्सनल व बिझनेस लोन देते, असे सांगून त्या दोघांनी शेकडो नागरिकांकडून लाखो रुपये जमा केले व त्यातील प्रत्येकाला १५ लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे मिळतील, उर्वरित ५ लाख रुपये रोखीने मिळतील, असे सांगितले होते.
कंपनीच्या ग्रुप लीडर रेखा कांबळे यांना हे ५ लाख रुपये कमिशन म्हणून द्यावे लागेल, असे सांगून पैसे गुंतवणूक केलेल्या प्रत्येकाला प्रत्येकी १५ लाख रुपयाच्या डिमांड ड्राफ्टच्या छायांकित प्रती दिल्या व त्यांची फसवणूक केली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन वपोनि एस. शिंदे यांनी केले आहे.