शहरात सायंकाळी सहा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी खळबळ, लाखोंचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:43 AM2019-02-05T01:43:56+5:302019-02-05T01:44:15+5:30
पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
पुणे : पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती़ त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला़ सिंहगड रोड परिसरात तीन, कोथरुड, वारजे येथे एका तासात पाच तर वानवडी येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक घटना घडली आहे.
गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२च्या दरम्यान मोटारसायकलवरील दोघांनी संपूर्ण शहरात धुमाकूळ घालून तब्बल १४ सोनसाखळ्या हिसकावून नेल्या होत्या़ त्यातील दोघांना पोलिसांनी काही दिवसांनी पकडले होते़ त्यानंतर शहरात एकाच दिवशी सहा सोनसाखळी हिसकाविण्याच्या ६ घटना प्रथमच घडल्या आहेत.
नºहे येथील मानाजीनगर गणपती मंदिराशेजारील भाजी मंडईत सायंकाळी ६ वाजता शारदा शिवाजी सालपे (वय ५१, रा़ सुश्रुत रेसिडेन्सी, मानाजीनगर) या सुनेसोबत भाजीसाठी गेल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले़ दरम्यान वडगांव बुद्रुक येथेही जिजामाता बहुउद्देशीय केंद्राच्या इमारतीसमोरून संध्याकाळी सव्वासहा वाजता वॉकिंगला जाणाऱ्या संगीता जावळकर (वय ४७, रा़ पॅलेस इमारत, माणिकबाग पेट्रोलपंपासमोर, वडगाव बुद्रुक) यांच्या गळ्यातील १ लाख १३ हजार रुपयांचे गंठण हिसकावून नेले़ त्यानंतर पाच मिनिटांनी गोयलगंगा सोसायटीजवळ ४७ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे गंठण हिसकावले. त्यानंतर दहा मिनिटांनी संतोष हॉल जवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. सलग तीन घटनांमुळे सिंहगड रस्ता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, एकाच टोळीने हे गुन्हे केले आहेत.
कोथरूड येथे उजव्या भुसारी कॉलनीमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी भुसारी कॉलनीपासून जवळच असलेल्या वेदभवनजवळ साखळी चोरीची घटना घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण मंदिरामध्ये गेल्या होत्या. तेथून त्या परत जात असताना त्यांचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले. वानवडीतील विकासनगर येथे नऊच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची साखळी लंपास केली.