नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत लाखोंची फसवणूक, बाप-लेक गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:44 PM2021-06-10T18:44:32+5:302021-06-10T18:45:06+5:30
माझा भाऊ नितिन गडकरी मंत्री आहे. आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत तुम्हाला माझे ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रूपये दया अशी बतावणी केली होती.
डोंबिवली : माझा भाऊ नितिन गडकरी मंत्री आहे, आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत माझ्या ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला 5 लाख रूपये दया, अशी बतावणी करीत अमोल पळसमकर यांना पाच लाखांचा गंडा घालण्याऱ्या राजन आणि आनंद गडकरी या बाप-लेकाला विष्णू नगर पोलिसांनी बंगळूरू येथून अटक केली आहे. पळसमकर यांना राजन आणि त्यांचा मुलगा आनंदने आमचे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दुकान आहे.
माझा भाऊ नितिन गडकरी मंत्री आहे. आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत तुम्हाला माझे ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला पाच लाख रूपये दया अशी बतावणी केली होती. यावर विश्वास ठेवत फेब्रुवारी २०२० ला पळसमकर यांनी पाच लाखांचा चेक दोघांकडे सुपूर्द केला होता. एक ते दोन महिन्यात तुम्हाला तुमचे सोने मिळून जाईल, असे राजन यांनी सांगितले होते. परंतु, दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही. त्या दोघांकडे पैसे मागितले असता त्यांनी आज देतो, उदया देतो असे सांगत टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पळसमकर यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठत गडकरी पिता-पुत्रंविरोधात तक्रार दाखल केली होती. या दोघांनी काही जणांना नोकरीचे आमिष दाखवित फसविल्याचेही या तक्रारीत म्हंटले होते.
दरम्यान, वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश जाधव यांच्या पथकाने बुधवारी दोघा आरोपींना बंगळूरू येथून अटक केली. तपासात मिळालेली माहीती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे अटक करण्यात पथकाला यश आले आहे. दोघांना 14 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे.
रूग्वेदचा ताबा आईकडे
24 मे पासून राजन, त्यांची पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातु रूग्वेद असे बेपत्ता झाल्याची तक्रार सुन गितांजली गडकरी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दिली होती. गडकरी पिता-पुत्र त्यालाही घेऊन बंगळूरूला गेले होते. त्या दोघांना अटक केल्यानंतर लहान मुलगा रूग्वेद याचाही ताबा त्याची आई गितांजलीकडे देण्यात आला आहे.