भिवंडीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी झटापट
By नितीन पंडित | Published: December 15, 2022 06:42 PM2022-12-15T18:42:31+5:302022-12-15T18:42:49+5:30
सदाफ उर्फ चापड अब्दुल रेहमान अन्सारी (वय २४) व शाबीर उर्फ अरबाज उर्फ पोलो अब्दुल रेहमान अन्सारी (वय २२) दोघे रा.नदीनाका असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिवंडी- भिवंडी शहरात अनेक भागामध्ये गुंगीकारक औषध नशा करण्यासाठी वापरले जात असून,अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झटापटीत धारदार चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना निजामपुरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. सदाफ उर्फ चापड अब्दुल रेहमान अन्सारी (वय २४) व शाबीर उर्फ अरबाज उर्फ पोलो अब्दुल रेहमान अन्सारी (वय २२) दोघे रा.नदीनाका असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
संगमपाडा गावदेवी मंदिराच्या बाजुला दोघे आरोपी आपसात संगनमत करून गुंगीकारक औषध नागरीकांना विकत असल्याची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना समजली असता त्यांनी पोलीस पथक कारवाई करण्यासाठी रवाना केले.त्या ठिकाणी गुंगी आणणाऱ्या सिरपच्या बाटल्या लोकांना विकत असतांना दोघे आढळून आले.पोलीस पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याकडील धारदार चाकू पोलीस पथकाच्या दिशेने हवेत फिरवून मारण्याची धमकी दिली तसेच मोठ-मोठयाने आरडा ओरडा करुन त्याच्या हातातील चाकू पोलिसांवर रोखत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पळवून लावले व वातावरण भयभित केले होते.
त्यावेळी पोलीस पथकातील सपोउपनि खान हे आरोपींना पकडण्यासाठी धावले असता आरोपींनी थेट पोलिसांसोबत झटापट केली. मात्र पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून ४२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.