पैशांसह साड्यांची लाच मागणारे क्लास वन अधिकारी असलेले बाप-लेक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 09:20 PM2020-11-30T21:20:13+5:302020-11-30T21:20:47+5:30
Bribe Case : तक्रारदार हे मालाड पश्चिमेकडील रोलेक्स अपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत.
मुंबई - सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सिंकिंग फंड वापरता यावा म्हणून, दोन लाख रूपयांसह दोन साड़यांची लाच मागणाऱ्या क्लास वन अधिकारी आणि त्याचा मुलगा एसीबीच्या जाळयात अडकला आहे. सहकार अधिकारी श्रेणी - १ भरत महादू काकड (५७) आणि त्यांचा मुलगा सचिन भरत काकड अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे मालाड पश्चिमेकडील रोलेक्स अपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत. सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सोसायटीचा स्पिकिंग फंड वापरता यावा म्हणून सोसायटी मार्फत उपनिबंधक सहकारी संस्था, पी विभाग यांच्याकडे लेखी अर्ज दिला होता. यावर परवानगी देण्याकरता भरत काकड़ यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने आरोपीने सोसायटीचे सचिव यांना डिफॉल्टर ठरवून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस धाड़ली.
तक्रार यांनी काकड़ यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्याने दोन लाख रुपये आणि दोन साड़यांची मागणी केली. पडताळणीत हे स्पष्ट होताच त्यांनी सापळा रचला. यात, त्यांचा मुलगा सचिन याला दोन लाख आणि दोन साड्या स्वीकारताना रंगेहाथ पकड़ले आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहेत.