सफाई कामगार बनला मुकादम; बनाव करून केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:52 AM2021-07-16T07:52:58+5:302021-07-16T07:53:41+5:30

घर देण्याच्या नावाखाली पोलिसासह अनेकांना गंडा.

cleaning worker become contractor many were cheated including police personnel | सफाई कामगार बनला मुकादम; बनाव करून केली फसवणूक

सफाई कामगार बनला मुकादम; बनाव करून केली फसवणूक

Next
ठळक मुद्देघर देण्याच्या नावाखाली पोलिसासह अनेकांना गंडा.

मनीषा म्हात्रे

मुंबई : एमएमआरडीएमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगाला शिवडी पोलिसांंनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. विजय मारुती कांबळे (३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसालाही त्याने पावणेअठरा लाखांना गंडविले आहे.

शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक अभिजित जाधव यांना मित्राकडून कांबळेबाबत माहिती मिळाली. कांबळे हा मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाचा नातेवाईक असून महापालिकेत मुकादम म्हणून काम करतो. त्याचसोबत तो एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पाचेदेखील काम करीत असून, कमी किमतीत घर मिळवून देत असल्याचे मित्राने सांगितले. त्याने संबंधित पोलीस नातेवाइकाकडे चौकशी करताच त्यानेही कांंबळे काम करून देणार असल्याचे सांगितल्याने विश्वास बसला.

कांबळेचे उच्च राहणीमान व त्याच्या बोलण्यात जाधवही अडकले. पुढे पत्नी असल्याचे सांगून पूजा नावाच्या महिलेसोबत ओळख करून दिली. दोघांनी कांजूर येथील एमएमआरडीएचे ४५ लाख किमतीचे घर २२ लाखांत मिळवून देणार असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेली गृहप्रकल्पाची इमारत दाखवून एकाच वेळी २२ लाख भरण्यास सांगितले. घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी बँक व नातेेवाइकांकडून १७ लाख ८० हजारांचे कर्ज काढून कांबळेला दिले. काही महिन्यांनी एमएमआरडीएच्या गृहप्रकल्प योजनेअंतर्गत घर मिळवून देण्याकरिता ॲग्रीमेंटचे पेपरही हाती आले. मात्र घराचा ताबा मिळत नसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी कांबळेबाबत अधिक चौकशी करताच तो मुकादम नसल्याचे समजले. ही मंडळी पालिकेत नोकरी लावण्याचे व शासकीय घर मिळवून देण्याच्या नावाखाली गंडवत असल्याचे समोर येताच जाधव यांनी १२ जुलै रोजी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी कांबळेला अटक केली. चौकशीत तो एन वॉर्डमध्ये कंत्राट पद्धतीने सफाई कामगार असल्याचे समोर आले. 

तुमचीही फसवणूक झाली आहे का?
कांबळेने अशा प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत ४ तक्रारदार समोर आले आहेत. यात तुमचीही अशी फसवणूक झाली असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: cleaning worker become contractor many were cheated including police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.