चलाख लिपिकानेच केला लोकविकास बँकेत ४७ लाखांचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:28 AM2020-11-06T02:28:40+5:302020-11-06T02:29:08+5:30
Lok Vikas Bank : भरत म्हसुजी शिंदे (रा. चौराह) असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सिडको, एन-९ येथील शाखेत शिंदे लिपिक होता.
औरंगाबाद : लोकविकास नागरी सहकारी बँकेतील लिपिकाने संगणकात चुकीच्या नोंदी करून ग्राहकांच्या खात्यातील ४७ लाख रुपयांचा अपहार केला. ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून काढून घेतली. बँकेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी लिपिकासह त्याच्या साथीदार महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
भरत म्हसुजी शिंदे (रा. चौराह) असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सिडको, एन-९ येथील शाखेत शिंदे लिपिक होता. दि.१३ जुलै ते १२ ऑक्टोबर या कालावधीत त्याने बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगणकावरून अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या आणि एका महिलेच्या खात्यावर वर्ग केली. चार महिन्यांच्या कालावधीत त्याने ४७ लाख रुपये वर्ग केले. अधिकाऱ्यांनी अचानक बँकेच्या व्यवहाराची तपासणी केली तेव्हा हा घोटाळा समोर आला.