हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:49 AM2023-02-25T06:49:36+5:302023-02-25T06:49:55+5:30
सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले.
मुंबई - एसआरएत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंदुजा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची लाखोंची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात धाव घेतल्यावर दुकलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वैभव कोरगावकर (४४) हे माहीम परिसरात राहतात. ते हिंदुजा रुग्णालयात क्लार्क म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीच्या भावाचा मित्र इस्टेट एजंट असल्याने एक फ्लॅट विकत घेण्याचे त्यांनी २०१०मध्ये ठरवले. त्यानुसार १० एप्रिल २०१९ रोजी त्यांनी राजू माळी या एजंटची सांताक्रूझ परिसरात भेट घेतली. तेव्हा त्याने त्यांना खारमधील डॉ. आंबेडकर सीएचएस इमारतीत एसआरए अंतर्गत काम सुरू असून, वनरूम किचन १३ लाख २० हजारांना घेऊन देतो, असे सांगितले. त्यानंतर वैभव यांनी पत्नी, आई आणि वडील यांच्याकडून आर्थिक मदत घेत ही रक्कम त्याला दिली.
माळीने वैभवना ‘ॲनेक्चर २’ आणून दिले, ज्यात त्यांच्या पत्नीचे नाव असल्याने आपल्याला फ्लॅट मिळेल असा विश्वास त्यांना वाटला. मात्र, त्यानंतर वैभव हे माळीकडे सतत फ्लॅटबाबत विचारणा करत होते. तेव्हा पत्नीचे कुठेही घर नसल्याच्या प्रमाणपत्राची मागणी माळीचा साथी संजय पाटील याने केली. सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले. माळीने दाखवलेली बोरिवलीतील इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने तिथे फ्लॅट घेण्यास वैभवने नकार दिला. तसेच त्यांचे पैसेही व्याजासकट परत मागितले. तेव्हा एवढी मोठी रक्कम आता आमच्याकडे नसून, आम्ही थोडी थोडी ती परत करतो, असे उत्तर त्यांनी त्यांना दिले. मात्र, ते पैसे अजूनही दुकलीने परत केले नसल्याने वैभव यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला.