चक्क पालिकेच्या ऑडिटरलाच लिपिक म्हणाला, तुमची फाईल पुढे पाठवतो, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 07:33 PM2018-11-28T19:33:52+5:302018-11-28T19:36:18+5:30
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सापळा लावून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर कोंडीराम चव्हाण (वय ३०) या लिपिकाला अटक केली आहे
मुंबई - ३१ वर्षीय पालिकेच्या ऑडिटरकडे अनुकंपाप्रकरणी फाइल पुढे पाठविण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या लिपिकाने लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) सापळा लावून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर कोंडीराम चव्हाण (वय ३०) या लिपिकाला अटक केली आहे. त्यामुळे पालिकेच्या ऑडिटरने लाचखोर पालिकेच्याच लिपिकाला अद्दल घडवली आहे.
तक्रारदार हे पालिकेत ऑडिटर म्हणून व्यवसाय करत असून त्यांचे काका हे पालिकेत कामाला होते ते २०१७ साली मयत झाले. त्यांच्या पि. टी. (अनुकंपा ) फाईल व निवृत्ती दावा फाईलचे सर्विस रेकॉर्डचे त्रुटी दुरुस्ती करून पुढे टेबल क्र. २२०७ आस्थापना शाखेत पाठविण्याकरिता ४ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३ हजार ५०० रुपये ही लाचेही रक्कम ठरली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून लाच स्वीकारताना चव्हाणला अटक केली. चव्हाण हा पालिकेच्या चंदनवाडी येथील सी प्रभागात घनकचरा व्यवस्थापन विभागात लिपिक म्हणून काम करतो.