उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 07:17 AM2024-10-30T07:17:27+5:302024-10-30T07:17:34+5:30
उलवे परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स पुरवठा तसेच विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.
नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने उलवे येथून १ कोटी २ लाख ५५ हजारांचे कोकेन हस्तगत केले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो मूळचा पश्चिम आफ्रिकेचा आहे. राहत्या घरात हे ड्रग्स मिळून आले.
उलवे परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स पुरवठा तसेच विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सहायक निरीक्षक अलका पाटील, महेंद्र ठाकूर, शरद भरगुडे, शिरीष चव्हाण आदींचे पथक केले.
या पथकाने उलवे परिसरात पाळत ठेवली असता सेक्टर २५ येथे राहणाऱ्या एका आफ्रिकन व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याचा ड्रग्स विक्रीच्या रॅकेटशी संबंध असल्याचे स्पष्ट होताच सोमवारी दुपारी त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
ड्रग्स विक्रीचे रॅकेट समोर येणार
या प्रकरणी जॉर्ज डॅसिल्व्हा (३५) याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोबर पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये त्याच्याकडून ड्रग्स विक्रीतल्या इतर सहकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४१० ग्रॅम कोकेन
घर झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत ४१० ग्रॅम कोकेन हा अमलीपदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार १ कोटी २ लाख ५५ हजार रुपये त्याची किंमत आहे. हे ड्रग्स त्याने ग्राहकांना विक्रीसाठी बाळगल्याची कबुली दिली आहे; परंतु त्याला या ड्रग्सचा पुरवठा कोणी केला याची माहिती उघड होऊ शकलेली नाही.