विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:58 AM2023-12-19T08:58:05+5:302023-12-19T08:58:13+5:30
भारतीय नागरिकाला अटक, डीआरआयची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तस्करी करत आणलेले ४० कोटींचे कोकेन आपण मुंबई विमानतळावरील तपास यंत्रणांना चकवा देत बाहेर काढल्याचा समज करत तो मुंबई विमानतळानजीकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी उतरला. पण, तो केंद्रीय महसूल तपास यंत्रणेच्या (डीआरआय) रडारवर असल्याची जाणीव त्याला अगदी थोड्या वेळात झाली. त्याने हॉटेलमध्ये चेक-इन केले आणि काही वेळातच त्याच्या रूमच्या दारावर अधिकाऱ्यांची टकटक झाली अन् अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगेतून तब्बल ४ किलो कोकेन जप्त केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती भारतीय आहे. आफ्रिका खंडातील सिएरा लिऑन देशातून तो मुंबईत दाखल झाला आणि तो शिताफीने बाहेर पडला. मात्र, त्या विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या व्यक्तीचा माग काढत अधिकारी त्याच्या हॉटेलपर्यंत पोहोचले. त्याच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगमध्ये दोन पिशव्या आढळून आल्या. अधिक तपासात त्यात कोकेन असल्याचे आढळून आले.