दीड कोटीचे कोकेन आग्रीपाडा येथून जप्त; सापळा रचून परदेशी आरोपीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:30 PM2021-03-24T15:30:42+5:302021-03-24T15:33:17+5:30
Drug case : हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने मध्यरात्री आग्रीपाडा येथील लाल मैदानाजवळ ५०० ग्राम वजनाचे कोकेनची तस्करी करणाऱ्या परदेशी इसमास अटक केली आहे. या कोकेनची किंमत दीड कोटी आहे. चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को, वय ३५ असं अटक आरोपीचे नाव आहे.
२३ मार्चला अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक मसवेकर यांना त्यांच्या विश्वासु बातमीदाराकडुन प्राप्त माहितीबाबत वरिष्ठांना माहीती देऊन घटनास्थळी सापळा रचण्यात आला असता त्या ठिकाणी खबरीने दिलेल्या माहीतीच्या अनुषंगाने आरोपी विकुएमेका इमान्युअल एनवॉन्को हा सापडला. त्यानंतर नमूद इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण ५०० ग्रॅम वजनाचा 'कोकेन' हा अमली पदार्थ मिळून आला. अटक आरोपीविरुध्द एनडीपीएस ऍक्ट १९८५च्या कलम ८ (क) सह २१ (क) आणि परदेशी नागरीक कायदा सह कलम १४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी मूळ नायजेरिया येथील असून तो सध्या नवी मुंबईतील जुईनगर येथे राहतो. तो तेथे कपड्याचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना त्याने तपासात सांगितले. हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.
हा आरोपी आग्रीपाडा येथे कोणाला कोकेन विकणार होता. या अमली पदार्थ तस्करीत सहभाग असलेल्या अन्य इसमांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
Maharashtra | Mumbai Anti-Narcotics Cell has arrested a 35-year-old Nigerian national from Agripada area and seized around 500 gram Cocaine worth Rs 1,50,00,000 from him pic.twitter.com/Y95uuXB6bq
— ANI (@ANI) March 24, 2021