‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

By योगेश पांडे | Published: May 17, 2024 11:57 PM2024-05-17T23:57:44+5:302024-05-18T00:00:31+5:30

गुंतवणूक खरी - ॲप मात्र बोगस, दिसतो केवळ ‘व्हर्चुअल’ प्रॉफिट : गुंतवणूक काढण्याची विनंती होते ‘रिजेक्ट’

'Coded' fraud by misguided, fake agents in the name of 'MNC' | ‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

ट्रेडिंगचा भुलभुलय्या (भाग-३)

नागपूर :‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली ‘प्रोफेसर गॅंग’द्वारे सुरू असलेल्या रॅकेटमध्ये विशिष्ट ॲपमध्ये गुंतवणूकदाराची नोंदणी झाल्यावर खऱ्या ठकबाजीला सुरुवात होते. विविध नामांकित आंतरराष्ट्रीय फायनान्शिअल इन्स्टिट्यूट्सच्या नवाखाली दिशाभूल करण्यात येते. बनावट ॲपच्या माध्यमातून हा प्रकार चालतो व खरे पैसे गुंतवणूकदारांकडून डिपॉझिट होत असताना ॲपवर मात्र केवळ व्हर्चुअल प्रॉफिट दिसत असतो. ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रवेश मिळविलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सायबर ठगांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनीचे नाव वापरत दिशाभूल केली.

‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’ या ग्रुपमध्येच दररोज मार्गदर्शन करणाऱ्या प्रोफेसर, आर्यन रेड्डी व देविका शर्मा या ॲडमिन्सकडून इतर छुप्या सदस्यांच्या माध्यमातून ब्लॉक ट्रेडिंगच्या नफ्याची हवा तयार करण्यात आली. त्यानंतर ब्लॉक ट्रेडिंगसाठी एकाच वेळी कोट्यवधींचे हजारो लाखो शेअर्स घेणारी वित्तीय संस्था शोधण्याच्या नावाखाली एका नामांकित मल्टिनॅशनल फायनान्शिअल कंपनीचे ‘बेबीएन रॅम्रो’ (नाव बदललेले) नाव समोर करण्यात आले. प्रत्यक्षात टोळीतील सदस्य असलेल्या दोघांना कंपनीचे कन्सल्टंट असल्याचे म्हणत ग्रुपमध्ये जोडण्यात आले. प्रत्येक शेअर सकाळी ९:३५ ते ९:५५ व दुपारी २:३० ते २:५० या कालावधीत नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांनाच मिळेल, असे सांगण्यात आले.


- किमान डिपॉझिट ५० हजार

संबंधित ॲपमध्ये डिपॉझिट केल्यावरच ब्लॉक ट्रेडिंगचे व्यवहार करण्यात येतील, असे सांगण्यात येते. डिपॉझिट करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना व्यक्तिगतरित्या विविध बँक खात्यांचे तपशील पाठविण्यात येतात. किमान ५० हजार रुपये डिपॉझिट करण्याची अट असते.

- एका मिनिटात मिळतो ५ ते १० टक्के नफा

एकदा का ॲपमध्ये पैसे डिपॉझिट झाले की ते तेथे दिसू लागतात. ॲडमिन किंवा एजंट्सकडून दररोज नियोजित वेळेत स्वस्त दरात शेअर विकत घेण्याअगोदर व्यक्तिगतरित्या एक ‘कोड’ पाठविण्यात येतो. तो ‘कोड’ टाकल्यावरच ॲपमध्ये शेअर्स अलॉट केले जातात व जमा असलेले पैसे शेअर्समध्ये वळते झाल्याचे दिसून येते. कमी किमतीत शेअर विकत घेतल्याघेतल्याच प्रत्यक्ष नफा हा ५ ते १० टक्के दिसून लागतो. जर बाजारात त्या शेअरचे भाव वधारले तर हा नफा आणखी दिसू लागतो. २० तासांच्या अवधीनंतरच हे शेअर्स विकले जाऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ॲपमध्ये शेअर्स विकल्यावर तेथील व्हर्चुअल खात्यात नफ्यासह रक्कम जमा झालेली दिसते.

- पैसे काढायला गेल्यावर खेळ खल्लास

गुंतवणूक केलेल्या ग्रुपमधील काही सदस्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ आपबिती मांडली. नफ्यासह रक्कम काही दिवसांतच दुप्पट ते तिप्पट होते. पैसे काढायला गेल्यावर मात्र कंपनीकडे रिव्ह्यूसाठी प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. जर रक्कम पूर्ण काढायची असेल तर आणखी ५ ते १० ट्रान्झॅक्शन्स करावे लागतील, असे सांगण्यात येते. किंवा अगोदर कमी पैसे असताना जास्त रकमेचे शेअर्स विकत घ्यावे लागल्याने पेनल्टी भरावी लागेल, असे उत्तर ॲडमिनकडून मिळते. त्यानंतर जर कुणी वाद घातला किंवा जास्त प्रश्न विचारले तर ॲपमधील खातेच फ्रिझ केल्याचे सांगण्यात येते. काही वेळाने सदस्याला ग्रुपमधून काढण्यात येते व त्यानंतरच फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते.

- अनेक कंपन्यांच्या नावाचा दुरुपयोग
सायबर गुन्हेगारांकडून केवळ एकच ‘एमएनसी’च नव्हे तर इतर अनेक कंपन्यांचे नाव समोर करत गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात येते. संबंधित कंपनीने त्यांच्या नावाचा सायबर गुन्हेगार दुरुपयोग करत असून अशा घटकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र बोगस एजंट्सकडून त्यांच्या व्हॉट्सअप डीपी व प्रोफाइलमध्ये कंपनीचा लोगो व माहिती ठेवल्याने लोक जास्त चौकशी न करता त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवतात.

(पुढील भागात : पैसे वळते करण्यासाठी ‘प्रोफेसर गॅंग’ची देशभरात शेकडो खाती...राजस्थान ते केरळपर्यंत ‘लिंक’)

Web Title: 'Coded' fraud by misguided, fake agents in the name of 'MNC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.