आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 06:04 AM2024-01-10T06:04:57+5:302024-01-10T06:05:53+5:30
काय आहे प्रकरण? जाणून घेऊया
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जोगेश्वरी येथे बांधण्यात येणाऱ्या एका तारांकित हॉटेलच्या बांधकामाच्या परवानगीत झालेली अनियमितता आणि मनी लाँड्रिग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी धाडी टाकल्या.
सकाळी साडेसातपासून दुपारपर्यंत छापेमारीची कारवाई सुरू होती. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वायकर यांचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या निवासस्थानीही छापेमारी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महानगरपालिकेत कार्यरत सब-इंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करत आहे.
त्रिपक्षीय करार झाला असूनही वायकर यांनी त्याची माहिती लपवत नव्या विकास प्रणालीतील तरतुदींचा फायदा घेत साडेतीन लाख चौरस फुटांचे १४ मजली पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी पालिकेकडून घेतल्याचा आणि या प्रकरणात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे.
काय आहे प्रकरण?
चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांच्या स्टुडिओच्या भूखंडापैकी आठ हजार चौरस मीटर भूखंड वायकर व अन्य चौघांनी विकत घेतला होता.
हा भूखंड मनोरंजन उद्यानासाठी आरक्षित होता. मात्र, १९९१ च्या विकास नियमावलीतील तरतुदीच्या आधारे या भूखंडाच्या मर्यादित विकासासाठी महल पिक्चर्स, वायकर व महापालिका यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता.
या करारानुसार, या भूखंडावर वायकर ३३ टक्के विकास करू शकतात व उर्वरित ६७ टक्के सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आली होती.
या ३३ टक्क्यांमध्ये बॅडमिंटन हॉलकरिता परवानगी असूनही वायकर यांनी तेथे सुप्रिमो बॅन्क्वेट्स नावाने लग्नाचा हॉल सुरू केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.