‘अब आओ उडा दुंगा’; धमकावणाऱ्या 'टायगर'चा नांदेड पोलिसांनी केला एन्काऊंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:30 PM2019-11-05T12:30:06+5:302019-11-05T12:32:25+5:30
नांदेडमध्ये पोलिसांनी केला शेरसिंघ ऊर्फ टायगरचा एन्काऊंटर
नांदेड : शहरात दोन ठिकाणी गन पॉर्इंटवर लूट करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तर फरार असलेल्या शेरसिंघ ऊर्फ टायगर याच्यासोबत झालेल्या चकमकीत शेरसिंघचा एन्काऊंटर करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
बी़ के़ हॉलमधील इमारतीत असलेल्या मेट्रो शूजच्या दुकानात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोघे जण घुसले होते़ ग्राहक असतील म्हणून कर्मचाऱ्याने त्यांचे स्वागत केले़ यावेळी आरोपींनी हम रिंदा के आदमी है़ग़ल्ले मे के पैसे निकाल असे म्हणून कर्मचाऱ्याला दमदाटी केली़ यावेळी दुकानात तीन कर्मचारी होते़ तर व्यवस्थापक बाहेर गेले होते़ कॅश काऊंटरजवळ गेल्यानंतर आरोपीने आपल्याजवळील बंदूक काढून त्यात गोळ्या भरल्या़ ही बंदूक कर्मचाऱ्याच्या डोक्याला लावून गल्ल्यातील रोख २१ हजार रुपये काढून घेतले़ त्याचबरोबर महागडे बुट आणि इतर साहित्यही आरोपींनी घेतले़ घटनेनंतर आरोपींनी पळ काढला़ ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती़ काही वेळातच व्यापाऱ्यांनी शटर डाऊन करीत या घटनेचा निषेध नोंदविला होता़ त्यानंतर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी नाके लावले होते़ प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती़ त्यात रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौक परिसरात अजय उर्फ भोप्या राजकुमार ढगे (वय २१, रा़ सैलानीनगर ) हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला़ तर शेरसिंघ ऊर्फ टायगर हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
रविवारी रात्रीपासूनच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेरसिंघच्या मागावर होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास शेरसिंघ हा बारसगाव ते बारड दरम्यान एका आखाड्यावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी शेरसिंघ हा झोपलेला होता. परंतु पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने आपल्याकडील बंदूक काढून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. तर प्रत्युत्तरात पोलिसांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शेरसिंघच्या डाव्या खांद्याला लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रुग्णालयात घेऊन येताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या वीस वर्षांहून अधिक काळानंतर नांदेडात एन्काऊंटर करण्याची ही पहिली घटना आहे.
अर्ध्या तासापूर्वीच बिअर शॉपीत राडा
मेट्रो शूजची घटना घडण्यापूर्वी आरोपींनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नमस्कार चौक येथे असलेल्या बिअर शॉपीत राडा घातला होता़ या ठिकाणी शॉपीचालकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील ३० हजार रुपये काढून घेतले होते़ त्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा श्रीनगर भागाकडे वळविला होता़
‘अब आओ उडा दुंगा’
शेरसिंघ हा आखाड्यावर असताना पोलिसांनी त्याला घेरले होते. यावेळी त्याने आपल्याजवळील दारुची बाटली काढून अख्खी बाटली एकाच दमात रिचविली. त्यानंतर आपल्याजवळील बंदूक काढून पोलिसांच्या दिशेने रोखत अब आओ उडा दुंगा, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांच्या दिशेने शेरसिंघने तीन गोळ्या झाडल्या.त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी झाडलेल्या दोन गोळीपैकी एक गोळी शेरसिंघला लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.