ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक
By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 08:43 AM2020-11-22T08:43:22+5:302020-11-22T08:45:17+5:30
Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्रग्स केस प्रकरणामध्ये शनिवारी एनसीबीने मोठी कारवाई केली. या कारवाईत कॉमेडियन भारती सिंह हिच्या घराच्या घेतलेल्या झडतीत गांजा सापडल्यानंतर एनसीबीने भारतीला अटक केली आहे. तसेच तिच्यावरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष याने ड्रग्स घेतल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला होता आणि या कारवाईत तिच्या घरात गांजा सापडला होता. त्यानंतर भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.
Haarsh Limbachiyaa, husband of comedian Bharti Singh, arrested by Narcotics Control Bureau (NCB). Singh was arrested yesterday.
— ANI (@ANI) November 22, 2020
NCB raided production office & house of Bharti Singh y'day & recovered 86.5 gms of Ganja from both places. Both of them accepted consumption of Ganja.
या चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली होती. तर काही वेळाने तिच्या पतीलाही अटक करण्यात आली. भारती आणि हर्षच्या नोकरांकडेही चौकशी करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर दोघांनाही रात्रभर एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात आले. अटकेत असलेल्या भारतीला भेटण्याची तिची आई आली होती. मात्र तिला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. आता आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.
अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला होता. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.