कॉमेडियन मुनव्वर फारुकींच्या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून रेड सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:53 PM2022-08-22T22:53:39+5:302022-08-22T22:54:14+5:30
या कार्यक्रमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये होऊन त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई : कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून रेड सिग्नल देत परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॉमेडीच्या माध्यमातून कुठल्याही धार्मिक वक्तव्यातून तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना १४९ अंतर्गत नोटीसही बजावली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुनव्वर फारूकी यांचा स्टँड अप कॉमेडी कार्यक्रम आपले रंगमंच प्रोडक्शन कंपनी तर्फे रविवारी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. फारूकी याने त्याच्या स्टैंड अप कॉमेडी या कार्यक्रमामध्ये हिंदु देवी देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल आहे. आगामी काळात गणेशोत्सव व नवरात्रौत्सव यासारखे सण साजरे करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये होऊन त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आपल्या कृतीमूळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्यास आपणांस सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल व त्यानुसार आपल्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.