भाईलोकांचं सरकार आल्याने यांची भाईगिरी सुरु झाली; मुंडनविरोधात किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 01:57 PM2019-12-24T13:57:40+5:302019-12-24T14:02:32+5:30
किरीट सोमय्या मुंडन केलेल्या व्यक्तीच्या समर्थनार्थ उतरले मैदानात
मुंबई - वडाळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी मुंडन केले. हा संतापजनक प्रकार वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनीशिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार दाखल करून कारवाई केली. मात्र, हा तक्रारीमुळे शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कालपासून भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी हे मुंडन केलेल्या हिरामणी तिवारी यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात कारवाई करण्याबाबत येऊन गेले. तसेच आज दुपारी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणाचा आढावा घेतला. तसेच सोमय्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यात भाईलोकांचं सरकार आहे. भाईगिरी सुरूच आहे. त्यामुळे जनतेला हिम्मत देण्याचं आमचं कर्तव्य आहे.
त्याचप्रमाणे किरीट सोमय्या यांनी पुढे सांगितले की, नागपुरात महापौरांवर गोळीबार करण्यात आला. तर राजकीय नेत्यांना धमक्या दिल्या जातात. वडाळ्यात जी काल मुंडन केल्याची घटना घडली. त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांना भेटलो असं सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे आता या वादात भाजपने उडी घेतली असून संबंधित शिवसेना पदाधिकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीचा जोर भाजपाकडून वाढवला जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला होता. तसेच भरचौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं होतं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी (३३) या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मात्र, त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी कायदाच हातात घेत तिवारी यांचे मुंडन केले होते.
ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मुख्यमंत्र्यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर टाकली म्हणून पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांच्या घरी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर यांनी दोन इसमांनी पाठवून हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच मशीनने त्याचे केस कापून मुंडन केले. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि दोन इसमांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचे जबाब नोंद केले असता त्यांनी त्यांच्यात समजोता झाल्याचे सांगून एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तिवारी यांचा जबाब नोंद करून समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.