पोलिसांची कौतुकास्पद कारवाई; रिक्षात राहिलेली 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग 24 तासात सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:53 PM2019-08-16T23:53:34+5:302019-08-16T23:56:34+5:30
सीसीटीव्हीमुळे सापडला रिक्षाचालक आणि मुद्देमाल
मुंबई - रक्षाबंधनासाठी जोगेश्वरी येथून सांताक्रूझ पूर्व परिसरात रिक्षाने आलेल्या प्रीती संतोष पाटील यांच्या हातातील हॅन्डबॅग रिक्षात राहिली. या बॅगेत 10 तोळे सोन्याचे दागिने आणि अमेरिकन डायमंड होते. रिक्षा सोडल्यानंतर तक्रारदार पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी शोध घेतला मात्र रिक्षा सापडला नाही. अखेर वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी अवघ्या २४ तासात लाखो रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार प्रीती पाटील याना मिळवून दिल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
तक्रारदार प्रीती पाटील यांच्याकडे ३ वर्षाचे बालक होते. त्या रिक्षाने प्रवास करून त्या त्यांच्या इच्छितस्थळी उतरल्या मात्र त्यांची दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांनी त्वरित कॉन्स्टेबल अर्जुन रत्नापूरके यांना रिक्षा शोधण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने रिक्षा सोडली त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचा शोध घेतला. त्यात पोलिसांनी एक रिक्षा नंबर मिळवला. रिक्षा चालक बंदर येथे राहणार असलयाचे नंबरवरून पत्ता मिळाला. राक्षचालक अनिल कुमार गुप्ता यांचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत चालक गुप्ताने आजारी असल्याने त्याने पोलिसांना कळविले नाही. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जसाचा तसा परत मिळवून दिला. वाकोला पोलिसांनी महिला तक्रारदाराला रक्षाबंधनाची हरविलेली लाखो रुपयांचे दागिने भेट म्हणून दिले. पाटील यांनी वाकोला पोलिसांचे आभार मानले.