आदित्य पंचोलीविरोधात तक्रार, बायोपिक ‘हवा सिंग’वरून झाला वाद, मुलाच्या भूमिकेसाठी दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:36 PM2022-02-10T12:36:56+5:302022-02-10T12:37:33+5:30
फर्नांडिस यांनी २०१९ मध्ये सूरजसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या बायोपिकची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांना सूरज मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाला पाठिंबा द्यायचा नव्हता.
मुंबई : भारतीय हेविवेट बॉक्सर हवा सिंग या बायोपिकवरून अभिनेता आदित्य पंचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांच्यात भांडण झाले आहे. मुलगा सूरज याला चित्रपटात कायम ठेवण्यासाठी आदित्यने त्याच्यावर दबाव टाकल्याचा आरोप सॅमने केला आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून वर्सोवा पोलीस ठाण्यातही पंचोलीने तक्रार अर्ज दिल्याची माहिती आहे.
फर्नांडिस यांनी २०१९ मध्ये सूरजसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या बायोपिकची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांना सूरज मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाला पाठिंबा द्यायचा नव्हता. त्यानुसार, फर्नांडिस सूरजशी याबद्दल बोलले, ज्याने त्यांना दुसऱ्या अभिनेत्यासोबत काम करण्यास सांगितले. मात्र, त्याचे वडील आदित्य पांचोली यांनी सूरजला कायम ठेवण्याचा आग्रह धरला आणि त्याला गुंतवणूकदार मिळेल, असेही सांगितले. पण, तसे झाले नाही. त्यांनी या चित्रपटासाठी काही पैसे दिले. पण, ते पुरेसे नव्हते. २७ जानेवारी रोजी आदित्यने फर्नांडिस यांना हॉटेलमध्ये बोलावले. त्याच्या खोलीत काही लोक आधीच उपस्थित असल्याने त्यांनी कॉरिडॉरमध्ये चर्चा सुरू केली, तेव्हा सूरजलाच चित्रपटात घ्यावे लागेल, असे सांगत पंचोलीने शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तसेच मारहाणही केली.
वर्सोवा पोलिसांकडे लेखी अर्ज
फर्नांडिसने जुहू पोलीस ठाणे गाठले आणि एनसी दाखल केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पंचोली यानेदेखील क्रॉस एनसी नोंदवली. फर्नांडिस याला पैशांची गरज असल्याने त्याला ९० लाख ५० हजार दिले, जे परत मागितल्यावर त्याने खोट्या आरोपात तक्रार केल्याचे पंचोलीचे म्हणणे आहे. तसेच याबाबत त्याने वर्सोवा पोलिसांकडे फर्नांडिसविरोधात दखलपात्र नोंदविण्याबाबत लेखी अर्ज केल्याचे म्हटले आहे.