लायकी काढणाऱ्या दीपक केसरकरांविरोधात पीडित महिलेने केली पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:18 PM2018-10-09T20:18:05+5:302018-10-09T23:19:18+5:30
"तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचे नाही" असे म्हणत दोघींना देखील केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
मुंबई - आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेले अनेक दिवस मंत्रालयात खेटे मारणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडित आणि तिच्या मुलीशी बोलताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची जीभ घसरली. न्याय मागण्यासाठी गेलेल्या या पीडित महिलेला सर्वांसमोर "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचे नाही" असे म्हणत दोघींना देखील केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
मूळची जळगावची असलेली पीडित महिला सध्या कल्याण परिसरात राहते. मे २०१७ मध्ये कल्याणच्या मांडा परिसरात राहणाऱ्या या पीडितेवर सात जणांनी प्रसादात गुंगीचे औषध देऊन पीडितेवर आणि तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी उंबरे झिजवले. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ करत तब्बल दीड महिन्यानंतर तक्रार नोंदवली. या प्रकरणात स्थानिक राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल करत इतरांना अभय दिले. या आरोपींकडून पीडितेला वेळोवेळी पाठलाग करून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात होते. त्यामुळे मागील सहा महिन्यात महिलेच्या कुटुंबियांना पाच वेळा घर बदलावे लागले आहे. आपल्याला न्याय मिळावा, या गुन्ह्यातील इतर आरोपींवर ही गुन्हा नोंदण्यात यावा आणि त्यांना ही अटक व्हावी. यासाठी मागील काही महिन्यांपासून पीडित महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी मंत्रालयातील विविध मंत्र्यांकडे येरझाऱ्या घालत आहेत. मात्र, आतापर्यंत तिला फक्त आश्वासनेच मिळत आली.
अखेर हे प्रकरण घेऊन पीडित महिलाही कुटुंबासह राज्याचे ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे गेली होती. या प्रकरणात केसरकर यांनी त्यांना आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे सोमवारी सायंकाळी पीडित महिला पुन्हा केसरकर यांना भेटण्यासाठी गेली. त्यावेळी पीडितेने त्यांना घडलेला प्रकार आणि पोलिसांची कूचकामी भूमिका सांगितली. त्यावर केसकरांनी आवाज चढवून उपस्थितांसमोर "तुम्हची लाईकी काय आहे. आमच्या येथे येण्याची, असे बोलून दालनातून हाकलून लावले. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ग्रामीण विभागाचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सोमवारी रात्री लेखी तक्रारीत हे आरोपी पीडितेने केले आहेत.
कथित पीडित महिला तिच्या पतीसह आज माझ्या दालनात आली होती. तिची व्यथा ऐकून मी तिच्यासमोरच ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावला. सदर महिलेच्या तक्रारीसंदर्भातील सर्व माहिती घेऊन मला भेटण्यासाठी या, असे मी पोलीस अधीक्षकांना सांगत असतानाच महिलेचा पती पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ करू लागला. मी त्याला समजावले पण त्याचे अर्वाच्य भाषेत बोलणे सुरूच होते. तेव्हा मी त्याला निघून जाण्यास सांगितले.
- दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री