शिवीगाळ, दमदाटी करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणल्याने प्रदीप शर्मांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 06:34 PM2019-10-22T18:34:03+5:302019-10-22T18:36:55+5:30
याबाबत प्रदीप शर्मा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला.
विरार - शिवसेनेचे नालासोपाऱ्याचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी करून शिवीगाळ केल्याप्रकरणी मतदान केंद्र अधिकारी बाळकृष्ण मालोंदे यांनी विरार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
विरार येथील चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणी मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली.काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास विरार पूर्व येथील चंदनसार, क्रमांक ६७ या मतदान केंद्रावर शर्मा हे अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी या केंद्र क्र. ११, झोन क्रमांक ६७ येथे केंद्राध्यक्ष असलेले बाळकृष्ण मालोंदे यांना प्रदीप शर्मा यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. केंद्राध्यक्ष बाळकृष्ण मालोदे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी प्रदीप शर्मा यांनी दमदाटी करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणला असा आरोप मालोदे यांनी केला. याबाबत प्रदीप शर्मा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला.