संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:05 AM2023-02-22T09:05:30+5:302023-02-22T09:06:00+5:30
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली गेली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी याबाबतचं पत्रक ठाणे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. राऊतांनी लिहिलेल्या पत्रात थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता, राऊत यांच्या तक्रारीनंतर संबंधित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे. या राजा ठाकूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनीच सुपारी दिली असल्याचा मोठा आरोपही राऊत यांनी केला आहे. त्यावरुनच, आता पूजा ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
संजय राऊत यांनी राजा ठाकूर याला गुंड म्हटले, तसेच सुपारी घेतल्याचाही आरोप केला आहे. त्याविरोधात, पूजा ठाकूर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली, संजय राऊत यांच्या विरोधात कलम 211 आणि 120b नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी आपल्या तक्रारीची दखल घ्यावी असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, दुसरीकडे स्वतः राजा ठाकूर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर, कबड्डी सामान्यांना श्रीकांत शिंदे उपस्थित होते कारण त्यांना स्पोर्ट्स आवडतो असे स्पष्टीकरण राजा ठाकूर यांनी दिलंय.
संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलंय
"महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा हटवण्यात आली याबाबत मी आधीच आपणास कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देणारे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती तुम्हाला देत आहे", असं संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.