रश्मी शुक्लांसह सहा जणांविरुद्ध तक्रार; ‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 09:38 AM2021-06-22T09:38:00+5:302021-06-22T09:40:05+5:30
‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर
अमरावती : कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर करून फोन टॅप करणे तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून खोटी चौकशी लावणे, तपास अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, वैयक्तिक जीवनातील गोपनीयता भंग करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप करीत शहर पोलीस आयुक्तालयातील उच्चश्रेणी लघुुुलेखक देवानंद भोजे यांनी अमरावती जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला (सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सदर तक्रार १८ जून रोजी नोंदविण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध थेट तक्रार असल्याने या संदर्भात
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.
देवानंद भोजे हे पूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचे स्टेनो म्हणून कार्यरत होते. गैरअर्जदार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला, अमरावती ग्रामीण स्टेनो टायपिस्ट जगदीश देशमुख, पोलीस शिपाई रूपेश पाटील, कार्यालय अधीक्षक किशोर शेंडे यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असून त्यात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
आरोप धादांत खोटे
कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर केल्याच्या तक्रारीतील या प्रकरणात माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत.
- डॉ. हरी बालाजी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अमरावती
आयुक्तांचे मार्गदर्शन
पदाचा दुरुपयोग करून खोटी चौकशी लावणे, तपास अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, वैयक्तिक जीवनातील गोपनीयता भंग करणे आदी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी असल्याने ती चौकशीत ठेवली असून त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.
- आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर