दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:54 PM2019-03-04T19:54:31+5:302019-03-04T20:07:30+5:30
राजू दुबेविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस अधिकाऱ्यांबाबत त्यांच्या सहभागाबाबत तपास सुरु आहे.
बोईसर - बोईसर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस उपनिरीक्षकांनंतर पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक सिंह यांनीच खंडणीबाबत तपस सुरु केला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून मागील दोन वर्षापासून या पथकातील अधिकारी त्यांच्या झिरो पोलिसांव्दारे ज्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत असे त्यांना हप्त्यासाठी त्रास देत असत आणि त्यांना मारहाण ही करत असत अशी तक्रार खाजगी इसमाने दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजू दुबेविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस अधिकाऱ्यांबाबत त्यांच्या सहभागाबाबत तपास सुरु आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील एका व्यापाऱ्यास अशाच प्रकारे काही दिवसापूर्वी अवैध गुटखाप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यानंतर राजु दुबे या हस्तकामार्फत त्यांचाकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती व यासाठी तगादा ही लावण्यात आला होता. याप्रकरणी पीडितेने पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केल्या. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री उशीरा खाजगी हस्तक राजु दुबे यांच्यावर कारवाई करण्यात आली. बोईसर पोलीस ठाण्यात त्याचाविरोधात भा. दं. वि.कलम ३८४, ३८९, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या सहभागाबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.