अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात मेंढ्या चारणे भोवले
By सदानंद सिरसाट | Published: August 6, 2022 08:46 PM2022-08-06T20:46:19+5:302022-08-06T20:46:35+5:30
विशेष व्याघ्र संरक्षण दल व मेंढपाळांमध्ये वाद, सोनाळा वनपरिक्षेत्रांतर्गत प्रकार
संग्रामपूर (बुलडाणा): मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या पथकाने शुक्रवारी कारवाई केली. कारवाई दरम्यान वन्यजीव विभागाचे कर्मचारी व मेंढपाळांमध्ये वाद झाल्याने मेंढपाळांविरुद्ध वन गुन्ह्यासह सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनाळा वनपरिक्षेत्रातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे कर्मचारी अभयारण्यात गस्तीवर असताना सोनबर्डी वर्तुळातील पिंगळी वनखंड क्रमांक ४५४ मध्ये १५० मेंढ्या चरत असल्याचे दिसून आले. व्याघ्रदलाच्या सात कर्मचाऱ्यांनी अभयारण्यात चरत असलेल्या मेंढ्यांवर जप्तीची कारवाई केली. मेंढ्यांना जंगलातील मार्गाने सुरक्षित ठिकाणी नेत असताना पाठीमागून आलेल्या १५ मेंढपाळांनी व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. तसेच जप्त केलेल्या १५० मेंढ्यांना पळवून नेल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाली. हा प्रकार सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत सोनबर्डी वर्तुळात घडला. याप्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम पिंगळी येथील १५ मेढपाळांविरुद्ध वन्यजीव वनसंरक्षण अधिनियमानुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती वन्यजीव विभागाने दिली आहे.
चार आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा
अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई केली. यादरम्यान पिंगळी येथील रवी डोमाळे, संदीप डोमाळे, संतोष डोमाळे, शंकर डोमाळे या चौघांनी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सोनाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली. वनरक्षक हिंमत विठ्ठल खांडवाहे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
"अभयारण्यात अवैधरीत्या मेंढ्या चारणाऱ्या पिंगळी येथील मेंढपाळांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून जप्त केलेल्या १५० मेंढ्या पळवून नेल्या आहेत. यात १५ आरोपींचा सहभाग असून, काहींची ओळख पटली आहे. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटक केली जाणार आहे", असे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सुनील वाकोडे यांनी सांगितले.