काय सांगता! कंपाऊंडर बनला डॉक्टर, २२ बेडचं हॉस्पिटल उभारलं; कोरोना रुग्णावरही उपचार केले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:25 PM2021-04-14T15:25:06+5:302021-04-14T15:27:16+5:30
पोलिसांनी सांगितल्यानुसार, बनावट डिग्री आणि नावासह हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षापासून सुरू होतं. ज्यावेळी आरोपीने एका व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली
पुणे – जिल्ह्यातील शिरूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कपाऊंडर बोगस डॉक्टर बनून २ वर्षापासून २२ बेडचं हॉस्पिटल चालवत आहे. एवढेच नाही तर त्याने कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्डही बनवला आहे. ज्यात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा कंपाऊंडर डॉक्टरकीचं बनावट डिग्री आणि नावानं लोकांची फसवणूक करत असल्याचं उघड झालं.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, बनावट डिग्री आणि नावासह हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षापासून सुरू होतं. ज्यावेळी आरोपीने एका व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली. तेव्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहचलं. तेव्हा प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांना या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
या आरोपीचं नाव मेहबूब शेख असं आहे. तो महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी नांदेडला राहणारा असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर त्याने बनावट हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार केला आणि त्याच्या जोडीला त्याने आणखी एका सहकाऱ्याला घेतले.
या दोन्ही पार्टनरमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिसांकडे हे प्रकरण पोहचल्यानं प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपीने बोगस प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही बनवली होती.