काॅम्रेड गोविंद पानसरे हत्या खटला; साक्षीदारांच्या साक्षी लांबणीवर
By उद्धव गोडसे | Published: March 6, 2023 02:06 PM2023-03-06T14:06:19+5:302023-03-06T14:06:45+5:30
त्या सुनावणीसाठी संशयित आरोपींनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होईल.
कोल्हापूर - संशयित आरोपींचे वकील सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यात सोमवारी (दि. ६) साक्षीदारांची साक्ष तपासणी होऊ शकली नाही. पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. त्या सुनावणीसाठी संशयित आरोपींनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी ४३ साक्षीदारांची यादी जिल्हा न्यायालयात सादर केल्यानंतर सोमवारपासून साक्षीदारांची साक्ष तपासणी सुरू होणार होती. त्यासाठी चार साक्षीदारांना समन्स पाठवून उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. सोमवारी चारही साक्षीदार सुनावणीसाठी जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर उपस्थित होते. मात्र, संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांना त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव सुनावणीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याचा अर्ज, त्यांच्या सहकारी वकिलांनी कोर्टात सादर केला. त्यामुळे साक्षीदारांची साक्षी तपासणी होऊ शकली नाही.
पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार असून, त्यावेळी संशयित आरोपींनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह एसआयटीचे अधिकारी, कॉम्रेड दिलीप पवार, मेघा पानसरे, आदी न्यायालयात उपस्थित होते.