Jignesh Mevani sentenced Jail: जिग्नेश मेवानींना तीन महिन्यांचा कारावास; राष्ट्रवादीच्या महिला नेत्यालाही शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:12 PM2022-05-05T15:12:19+5:302022-05-05T15:14:01+5:30
Jignesh Mevani imprisonment: अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांच्या न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना “रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे”, असे निरीक्षण नोंदवले.
गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना महेसाणा कोर्टाने मोठा झटका दिला आहे. त्यांच्यासह १२ जणांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर त्यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याचाही सहभाग आहे.
परवानगी न घेता रॅली घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर महेसाणा कोर्टाने मेवानींसह राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल आणि सुबोध परमार यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण पाच वर्षे जुने असून २०१७ मध्ये या आरोपींनी आझादी कूच रॅली काढली होती. यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपांखाली न्यायालयाने या १२ जणांना दोषी ठरविले आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांच्या न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना “रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे”, असे निरीक्षण नोंदवले. कौशिक परमार याने मेवाणी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय दलित अधिकार मंच या संघटनेच्या बॅनरखाली रॅलीसाठी मेहसाणा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी सुरुवातीला परवानगी देखील देण्यात आली होती. परंतू, पुन्हा ती मागे घेण्यात आली होती.