ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:19 PM2024-05-22T12:19:18+5:302024-05-22T12:20:24+5:30
loksabha Election - अबू बकर हा मौलाना सुहैल याच्या संपर्कात होता. ज्यामुळे सुरत पोलीस बीकानेरला पोहचली. या युवकाला अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला.
बीकानेर - राजस्थानच्या बीकानेर इथं सूरत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका युवकाला अटक केली आहे. या युवकाच्या मोबाईलमधून त्याचे पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी नंबरही आढळले आहेत. अटक आरोपी अशोक उर्फ अबू बकर हा एका कट्टरतावादी संघटनेशी जोडल्याचाही आरोप आहे.
पोलिसांनी आधी एका मौलवीला अटक केली होती. त्यांच्या मोबाईल चॅटमधून देशातील प्रमुख नेत्यांना मारण्याची योजना असल्याचा उल्लेख सापडला. त्यानंतर सूरत क्राइम ब्रांच टीमनं मौलवीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या संपर्कात असणाऱ्या अबू बकर यालाही राजस्थानच्या बीकानेर इथून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मौलवीच्या मोबाईल चॅटींगच्या आधारे सूरत पोलिसांनी इतर मोबाईल क्रमांक ट्रेस केले. तेव्हा तो बीकानेर येथील विश्वकर्मा गेट रहिवासी अशोक सुथार उर्फ अबू बकरचा असल्याचं समोर आले.
अबू बकर हा मौलाना सुहैल याच्या संपर्कात होता. ज्यामुळे सुरत पोलीस बीकानेरला पोहचली. या युवकाला अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला. त्यात अनेक पाकिस्तानचे नंबर सापडले. त्यामुळे हा युवक पाकिस्तानातील फुटिरतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुजरात पोलिसांनी सुहैल नावाच्या मौलवीला दहशतवादी मॉड्युल ऑपरेशनतंर्गत अटक केली होती. या मौलवीच्या मोबाईलमधून देशातील प्रमुख नेत्यांच्या हत्येचा कट रचण्याची योजना उघडकीस आली. मौलवीच्या मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद चॅटिंग आढलल्या.
बीकानेरमध्ये पकडलेल्या आरोपीनं धर्म परिवर्तन केले आहे. त्यानं अशोक नाव बदलून अबू बकर ठेवलं आणि तो दिल्लीत राहत होता. संगणकाशी निगडित तो एका दुकानात काम करायचा. सध्या पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि कॅम्प्युटर जप्त केले आहेत. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे. विविध तपास यंत्रणा आरोपी युवकाची चौकशी करत आहेत. जर या काही संशय आढळला तर बीकानेर पोलिसही कारवाई करतील. तपास यंत्रणांकडून संयुक्त चौकशी करण्यात येत आहे.