नक्षल दहशतीच्या विरोधात काढली संविधान तिरंगा यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:51 IST2020-01-27T20:48:21+5:302020-01-27T20:51:47+5:30
नागरिकांचा सहभाग : आलापल्लीवरून लाहेरीपर्यंत फिरला भलामोठा तिरंगा

नक्षल दहशतीच्या विरोधात काढली संविधान तिरंगा यात्रा
भामरागड (गडचिरोली) : लोकशाही मार्गाने चालणारे सरकार आणि संविधानानुसार चालणाऱ्या व्यवहाराला विरोधी करत नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच निरापराध्यांचे बळी घेऊन दहशत पसरविली जाते. परंतु, त्याला न जुमानता लोकशाहीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने जनसंघर्ष समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवार २६ जानेवरीला आलापल्ली ते भामरागड आणि पुढे छत्तीसगड सीमेकडील लाहेरीपर्यंत संविधान तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. भल्यामोठ्या तिरंग्यासह निघालेल्या या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
जनसंघर्ष समिती नागपूरचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांच्यासह त्यांचे सहकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, रितेश बडवाईक, डॉ.श्रुती आष्टनकर, उडान फाऊंडेशनचे रमेश दलाई, रवी नीलकुद्री, प्रशांत मित्रावार, तसेच जनसंघर्ष समितीचे सदस्य संदेश लोधी, पंकज दुर्वे, अभिशेक सावरकर, गोलू ठाकरे, बरखा बडवाईक, प्रशांत शेंडे, रोशन ताईकर, शैलेश बामुलकर, आयुष्य दुबे, नीलेश गोमिसे, आशिष चौधरी, अभिजीत डायघने, महेश ढोबळे, मारूती मज्जी आदी सहभागी झाले होते.
भामरगडला पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तिरंगा खांद्यावर घेऊन लोकबिरादरी शाळेचे विद्यार्थी सोबत होते. येथील बाजार चौक येथे सकाळी ९ वाजता जनसंघर्ष समितीच्या वतीने नागरिकांच्या उपस्थितीत संविधान पुस्तिका व तिरंगा पूजन करण्यात आले. तसेच सामूहिक राष्ट्रगीत झाले. त्यानंतर संविधानाचे अधिकार व कर्तव्य याचे सामूहिक वाचन करून ही तिरंगा यात्रा लाहेरीकडे रवाना झाली.
दरवर्षी घेणार कार्यक्रम
देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक जण हुतात्मा झाले. पण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही स्वातंत्र्य कोसो दूर असल्यासारखे भयावह चित्र आहे. नक्षलवादी चळवळीत देशाचे अतोनात नुकसान होत असताना आपण एक व्यक्ती म्हणून काहीही करू शकत नाही का? की फक्त शासकीय यंत्रणा, पोलिसांचेच ते काम आहे, असे म्हणून गप्प बसणार? देशाच्या सीमेवर व देशाअंतर्गत आपल्या जवानांसोबत कायम उभे आहोत याची जाणीव वेळोवेळी त्यांना करून देण्याच्या हेतूने भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात जाऊन तेथे तैनात सुरक्षा दल आणि स्थानिक रहिवाशांसोबत प्रजासत्ताक दिन व स्वतंत्र्य दिवस साजरा करणार असल्याचे जनसंघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले.