यूएलसी घोटाळ्यात सल्लागार अभियंता अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:10 PM2021-08-02T12:10:39+5:302021-08-02T12:11:04+5:30
भाईंदर : मीरा-भाईंदरच्या अनिष ॲड.असोसिएट्सचे सल्लागार अभियंता अनिल मोतीरामानी याला यूएलसी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्रे प्रकरणी ठाणे शहर गुन्हे शाखेने ...
भाईंदर : मीरा-भाईंदरच्या अनिष ॲड.असोसिएट्सचे सल्लागार अभियंता अनिल मोतीरामानी याला यूएलसी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्रे प्रकरणी ठाणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मीरा-भाईंदर येथील अनेक जमिनीवर शासनाच्या नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमाच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकूल योजना मंजूर आहेत, परंतु भाईंदर पश्चिमेस बनावट यूएलसी प्रमाणपत्रांद्वारे शासनाला १०२ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण २०१६ साली ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आले. त्यावेळी काही विकासकांना अटक करण्यात आली, परंतु तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही अधिकारी व बडे बिल्डर यांना वाचविण्यात आल्याच्या तक्रारीनंतर पुन्हा तपास सुरू करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी नगररचनाकार दिलीप घेवारे, निवृत्त सहायक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद शेखर लिमये व यूएलसी विभागातील कर्मचारी कांबळे यांना अटक झाली आहे. पोलिसांनी सल्लागार अभियंता अनिल मोतीरामनी याला अटक केली असून, सोमवार २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुन्ह्यातील बनावट यूएलसी प्रमाणपत्रे ही मोतीरामनीच्या माध्यमातून मिळविली गेली आणि त्याने महापालिकेत बांधकाम नकाशे, प्रस्ताव सादर करून, बांधकाम परवानग्या मिळवून दिल्याचे व आर्थिक देवाण-घेवाण केल्याचे सूत्रांनी सांगितले.