हॉर्न वाजविण्यावरून वाद; तरुणाचे डोके ठेचले, गोरेगावमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:49 AM2022-11-01T06:49:48+5:302022-11-01T06:50:04+5:30

सहा जणांनी मिळून गौरवला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे डोके पेव्हर ब्लॉकने ठेचले.

Controversy over honking; A young man's head was crushed, a shocking incident in Goregaon | हॉर्न वाजविण्यावरून वाद; तरुणाचे डोके ठेचले, गोरेगावमधील धक्कादायक प्रकार

हॉर्न वाजविण्यावरून वाद; तरुणाचे डोके ठेचले, गोरेगावमधील धक्कादायक प्रकार

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : मोटारसायकलचा हॉर्न वाजविण्याच्या वादातून तरुणाला टोळक्याकडून जबर मारहाण करून त्याचे डोके पेव्हर ब्लॉकने ठेचल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. गौरव गरुडे (३१) असे या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गौरवची प्रकृती चिंताजनक आहे. 

यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, खासगी कंपनीत फोटोग्राफी करणारा गौरव भाऊबीजेच्या दिवशी गोरेगावातील बांगुरनगर परिसरात राहणाऱ्या मित्राला दिवाळीनिमित्त मिठाई देण्यासाठी गेला होता. तिथे मोटारसायकल पार्किंगच्या मुद्द्यावरून स्थानिक तरुणांनी त्याला हटकले. गौरवने थोड्या अंतरावर जाऊन गाडी पार्क केली. मात्र, तिघांनी गौरवशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला धक्काबुक्कीही केली. त्यास गौरवने प्रतिरोध करताच आणखी तिघेजण घटनास्थळी आले.

सहा जणांनी मिळून गौरवला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे डोके पेव्हर ब्लॉकने ठेचले. मारहाण करणाऱ्यांपैकी काहींनी गौरवला हॉस्पिटलला नेले. तसेच त्याच्याकडील आधार कार्डवरून पत्ता शोधून गौरवच्या घरी येऊन त्याला ट्रॉमा केअर हॉस्पिटलला दाखल केल्याची माहिती दिली. दरम्यान, हॉर्न वाजविण्याच्या मुद्द्यावरून हा प्रकार घडला असून आम्ही या प्रकरणी चौघांना अटक केली आहे, अशी माहिती बांगुरनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी दिली. 

स्थानिकांकडून बघ्याची भूमिका...

गौरवला मारहाण झाल्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून गौरव घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यात दिसते. सहा जणांचे टोळके त्याचा पाठलाग करत असून स्थानिक लोक बघ्याची भूमिकेत असल्याचे दिसते. गौरवची प्रकृती गंभीर असून त्याच्या मेंदूला मार लागला आहे. गेल्या आठवड्यापासून तो बेशुद्धच आहे, असे गौरवचे वडील अशोक गरुडे यांनी सांगितले. गौरवला ट्रॉमा केअर हॉस्पिटलमधून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: Controversy over honking; A young man's head was crushed, a shocking incident in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.