स्वयंपाक करणाऱ्याने दिले वृद्ध मालकिणीसह तिच्या मुलीला विष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:22 PM2018-09-03T14:22:18+5:302018-09-03T14:22:57+5:30
या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी रिजउल हक मंडल (३३) याला रविवारी अटक केली आहे.
मुंबई - एका उच्चभ्रू वसाहतीत राहणाºया वृद्ध महिलेसह तिच्या मुलीला घरातील स्वयंपाक करणाºयाने जेवणातून उंदीर मारण्याचे विष दिल्याची घटना कुलाब्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी रिजउल हक मंडल (३३) याला रविवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथील एका उच्चभ्रू इमारतीत झिनिया खाजोटिया (६५) राहतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तिघेही परदेशात स्थायिक झाले. येथे झिनिया यांच्या सेवेसाठी दोन नोकर आणि स्वयंपाकी आहेत. ६ आॅगस्ट रोजी खाजोटिया या सिंगापूर येथून मुंबईत आल्या. घरी जेवल्यावर त्यांना गुंगी येऊ लागली. त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी त्यांची मुलगी अमेरिकेवरून कुलाब्यात काही दिवस राहण्यास आली. मुलीला त्यांनी हा प्रकार सांगितला. मुलीने आईसोबत जेवण केल्यानंतर तिलाही झोप येऊ लागली. काही दिवस असा प्रकार घडल्यानंतर झिनिया यांची प्रकृती खालावली. तेव्हा मुलीने त्यांना रुग्णालयात नेले.
तपासणीत डॉक्टरांनी दोघींच्या रक्ताचे नमुने घेतले. २४ आॅगस्ट रोजी रक्ताच्या नमुन्याचे अहवाल आले त्या वेळी दोघींच्या रक्तामध्ये थॅलियम हा विषारी पदार्थ असल्याचे दिसून आले. उंदीर मारण्यासारखे विष दिल्यामुळे हे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामागे स्वयंपाकीच असल्याचा संशय त्यांना आला. काही दिवस गेल्यानंतर त्यांनी कुलाबा पोलीस ठाणे गाठून हा प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तपास करत मंडल याला अटक केली.