ठाणे पोलीस दलात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएस अधिकाऱ्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:36 PM2022-01-06T19:36:50+5:302022-01-06T19:37:11+5:30
Thane Police : १४ रुग्णालयात तर २५ पोलीस गृहविलगीकरणात
ठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही होऊ लागला आहे. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) प्रवीण पवार तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १४ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी एका अधिकाऱ्यासह ३७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ३१४ अधिकारी आणि दोन हजार १६६ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, संपूर्ण ठाणे शहर पेालीस दलाचे प्रशासन सांभाळणारे अतिरिक्त पोलीस आयुक्त पवार यांना २ जानेवारी २०२२ रोजी कोरोनाची लागण झाली. त्याच दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त लोखंडे यांनाही ३ जानेवारी रोजी लागण झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांवर सध्या गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बुधवारी एका आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ एका पोलीस कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. गेल्या आठवडाभरात ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १४ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये तर २५ जणांना गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांमध्ये पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे आयुक्तालयात चिंतेचे वातावरण आहे.