कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण फिरत होता बाहेर; गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 07:59 PM2021-02-28T19:59:48+5:302021-02-28T20:00:34+5:30
Coronavirus in Mumbai :महानगर पालिकेच्या वतीने त्या मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मुंबई : कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाही होम क्वारंटाईन राहण्याऐवजी बाहेर फिरणाऱ्या चेंबूरमधील ५२ वर्षीय इसमाविरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी चेंबूरच्या सायन-पनवेल मार्गालगत असणाऱ्या एका सोसायटीमधील २० वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे महानगर पालिकेच्या वतीने त्या मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
दोन दिवसांनंतर त्या मुलीच्या आई-वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली. या कुटुंबातील सदस्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असताना देखील २७ फेब्रुवारी रोजी मुलीचे वडील चेंबूर जिमखाना क्लब येथे गेले. याबाबत हे कुटुंब राहत असलेल्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पालिकेच्या एम पश्चिम विभागात माहिती कळविली. याबाबत माहिती मिळताच पालिकेचे आरोग्य कर्मचारी त्या कोरोना बाधित इसमाच्या घरी गेले. यावेळी त्या इसमाच्या घराचा दरवाजा त्याच्या पत्नीने उघडला. यावेळी पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पतीची विचारणा केली असता ते बाथरूम मध्ये असल्याचे सांगण्यात आले. त्याच प्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत, आपल्याला काही काम धंदा नाही का असे बोलून दरवाजा बंद करून घेतला. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या इसमाच्या मोबाईलवर फोन केला असता त्याने फोन देखील उचलला नाही. याप्रकरणी कोरोनाच्या नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरुन कोरोनाच्या संसर्गास कारणीभूत ठरल्या प्रकरणी विरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.