खासगी लॅबमध्ये ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी तपासात निगेटिव्ह
By प्रविण मरगळे | Published: September 24, 2020 01:16 PM2020-09-24T13:16:04+5:302020-09-24T13:18:19+5:30
२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला
कानपूर – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आतापर्यंत ५७ लाखांहून जास्त लोक बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासात ८६ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर पोहचली आहे. काही लोकांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या लॅबमध्ये ज्या ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांचा सरकारी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर प्रशासन जागं झालं असून सीएमओने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या रुग्णाने लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने दुसर्या प्रयोगशाळेतही त्याची चाचणी केली, मात्र त्याठिकाणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्या व्यक्तीने लॅबची तक्रार केली.
स्वत: डीएम जेव्हा तपासणी करायला आले तेव्हा तेथे आढळून आले की बर्याच रूग्णांची नावे व पत्ते आणि मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवली आहेत. डीएम आलोक तिवारी म्हणाले की, चुकीचे अहवाल देणे, पॉझिटिव्ह रूग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहणे, चाचणीसाठी जास्त पैसे घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लॅबला सील केले. एडीएम सिटीच्या देखरेखीखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती, ज्यात दोन एसीएमओचा समावेश होता. या समितीने लॅबची संपूर्ण चौकशी केली.
या चौकशीदरम्यान २० सप्टेंबरच्या तीन दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी रेकॉर्डची पडताळणी केली. लॅबने ज्या लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ३० कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अद्याप १२ रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत कानपूरचे डीएम आलोक तिवारी म्हणतात की, ज्ञान पॅथॉलॉजीने कोरोना पॉझिटिव्ह घोषित केलेल्या ३० लोकांकडून पुन्हा नमुने घेण्यात आले. आरटीपीसीआर तपास केला. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ३० पॉझिटिव्ह सहा दिवसांत निगेटिव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पण ज्ञान पॅथॉलॉजीचे संचालक डॉ अरुण कुमार म्हणतात की, तीन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊ शकतात. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना चाचणी रिपोर्ट देण्यात आला आहे. पुन्हा लोकांचे नमुने घेतले गेले त्यात मानकांचे पालन केले गेले आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. कदाचित डेटा फीडिंगमध्ये गडबड झाली असावी मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाही असा दावा त्यांनी केला आहे.