कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; तरुणाची महिला डॉक्टर, नर्सना मारहाण
By हेमंत बावकर | Published: October 14, 2020 09:41 AM2020-10-14T09:41:58+5:302020-10-14T09:43:01+5:30
Corona test Report Positive: डिस्पेन्सरी इन्चार्ज आणि मेडिकल अधिकारी डॉ. रीना सहगल यांच्या तक्रारीवरून जगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पूर्व दिल्लीच्या जगतपूरी भागात एका तरुणाने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्ली सरकारच्या डिस्पेन्सरीची डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या तरुणाने दुसऱ्या दिवशी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा चाचणी केली तो निगेटिव्ह आला. यामुळे खोटा रिपोर्ट दिल्याच्या रागातून तरुणाने डिस्पेंन्सरीच्या डॉक्टरांना मारहाण केली.
स्थानिकांनी डिस्पेंसरीमध्ये जाऊन त्यांना वाचविले. डिस्पेन्सरी इन्चार्ज आणि मेडिकल अधिकारी डॉ. रीना सहगल यांच्या तक्रारीवरून जगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
डॉक्टर सहगल यांनी सांगितले की, शनिवारी जगतपुरीचा राहणारा शानू नावाचा तरुण डिस्पेन्सरीमध्ये आला होता. त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दुसऱ्या दिवशी हा तरुण पुन्हा काही लोकांसोबत आला आणि आपल्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच शिवीगाळही केली.
तक्रारीनुसार जेव्हा डॉक्टरांनी त्यांना विरोध केला तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याने दुसऱ्या दिवशी डॉ. हेगडेवार हॉस्पिटलमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट केली होती. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्याने डॉक्टरांवर चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप केला.
तर मारहाण झालेल्या डॉ. रीना यांचे म्हणणे होते, त्या तरुणाने त्याची दुसरी रिपोर्ट दाखविली नाही. डिस्पेन्सरीमध्ये मोठमोठ्याने येत असलेले आवाज ऐकून शेजारी धावून आले आणि डॉक्टांना सोडविले. यानंतर आरोपी पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.