Corona Vaccination: फेक कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने त्याने पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:04 PM2021-12-08T12:04:39+5:302021-12-08T12:05:11+5:30
Coronavirus, Corona Vaccination: एका व्यक्तीने फेक कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते.
बर्लिन - जर्मनीमध्ये एका व्यक्तीने फेक कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने आधी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यास कुटुंबावर कारवाई करण्यात येईल, अशी भीती त्याला वाटत होती.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार बर्लिनमधील दक्षिण कोएनिग्स वुस्टरहाऊजेन येथील ही घटना आहे. शनिवारी शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पती-पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह जप्त केले. मुलींचे वय १०, ८ आणि ३ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांना घटनास्थळावर एक पत्रही सापडले आहे. त्यामध्ये डेव्हीड आर. नावाच्या व्यक्तीने लिहिले की, मी माझी पत्नी लिंडासाठी एक बनावट लसीकरण सर्टिफिकेट बनवले होते. वकील गर्नोट बेंटलोनने डीपीए या वृत्तसंस्थेला सांगितले की, संबंधित व्यक्तींना अटक करण्यात येईल. मुलगी लेनी, जेनी आणि रुबी यांना त्यांच्यापासून दूर करण्यात येईल, अशी भीतीही त्यांना वाटत होती.
जर्मनीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी एक नवा कायदा बनला आहे. त्याअंतर्गत कोविड लस घेतल्याचे खोटे सर्टिफिकेट बनवणे हा एक गुन्हा ठरवण्यात आला आहे. असे केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंडात्मक कारवाई अशा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांना असलेल्या संशयानसुरा या व्यक्तीने आधी आपल्या पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. पोलिसांना घरातून एक बंदुकही मिळाली आहे. मात्र याच बंदुकीमधून गोळी चालली का हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृतदेहांचे पोस्ट मार्टम होणार असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.