Corona vaccine: कोरोना लस समजून चोरले पोलिओचे २५ डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:22 AM2021-05-25T10:22:35+5:302021-05-25T10:23:45+5:30
ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली.
अंबरनाथ : मौल्यवान वस्तूंची चोरी होणे सर्वश्रुत आहे. मात्र, या मौल्यवान वस्तूंच्या यादीत कोरोनाची लसदेखील समाविष्ट झाली आहे. त्याचा प्रत्यय अंबरनाथ ग्रामीण भागात आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस समजून चोरट्यांनी चक्क पोलिओचे डोस चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली.
मलंगगड परिसरात असलेल्या मांगरूळ आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी कोरोनाच्या लसी लांबविण्याचा डाव आखला. रविवारी रात्री आरोग्य केंद्राच्या बाथरूमच्या खिडकीची ग्रील उचकटून चोरट्यांनी आरोग्य केंद्रात प्रवेश केला. आरोग्य केंद्रातील फ्रीजमध्ये ठेवलेल्या पोलिओच्या २५ लसी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. लस आणि पोलिओचे डोस यातला फरक मात्र या चोरट्यांना समजला नाही. त्यामुळेच पोलिओचे डोस चोरून नेले असावेत, अशी चर्चा सुरू आहे.
ज्या ठिकाणी या लसींचे डोस ठेवण्यात आले होते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्क्रीनसुद्धा चोरून नेली. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.