Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्या पत्नीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:22 PM2020-06-29T12:22:31+5:302020-06-29T12:22:56+5:30
फिर्यादी महिलेच्या पतीला व मुलाला कोरोनाची लागण
पुणे : कोरोनाची लागण झाली असल्याने खोपोलीला स्वत:च्या आईकडे जाऊ नये, असे सांगणाऱ्या पत्नीलाच पतीने बेल्टने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोरपडी पेठेतील बी टी कवडे रोडवरील सोलेस पार्क येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ३८ वर्षाच्या पत्नीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़
कोरोनाची लागण झालेल्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घ्यावे. लक्षणे दिसत नसली तरी त्यांनी घरातच रहावे.त्यांनी बाहेर फिरु नये, असे सातत्याने आवाहन केले जात आहे़ तरी अनेक जण घराबाहेर फिरत असतात़ अशा होम क्वारंटाईन केलेल्या परंतु, बाहेर फिरणाऱ्या लोकांवर यापूर्वी पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेच्या पतीला व तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. असे असताना तिचा पती स्वत:च्या आईकडे खोपोलीला जात होता.आपल्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून तुम्ही खोपोलीला आईकडे जाऊ नका, असे सांगून पत्नीने मनाई केली. यावरुन त्यांच्यात २७ जूनला मध्यरात्री साडेबारा वाजता भांडणे झाली. तरीही पती खोपोलीला जाण्यावर ठाम होता. पत्नी आपल्याला आईकडे जाऊ देत नाही, या रागातून पहाटे ३ वाजता त्याने पत्नीला शिवीगाळ करीत हाताने, बेल्टने व लाकडी काठीने पोटावर, पाठीवर मारहाण करुन जखमी केले़ पत्नीवर उपचार केल्यानंतर तिने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोक किती निष्काळजी आहेत, याचे हे एक प्रातिनिधीक उदाहरण ठरावे.