Corona virus : 'कोरोना पॉझिटिव्ह' ची तपासणी करणाऱ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 19:05 IST2020-07-30T19:03:52+5:302020-07-30T19:05:29+5:30
नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक

Corona virus : 'कोरोना पॉझिटिव्ह' ची तपासणी करणाऱ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
रेंजहिलमधील घटनेत ६ जणांवर गुन्हा
पुणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियांची तपासणी करण्यासाठी घरी आलेल्या खडकी बोर्डाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यालाच शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीसह पुतण्याला अटक केली आहे.
कैलास डेमाजी पहिलवान (वय ५०) आणि किरण शंकर पहिलवान (वय ४०, दोघेही निता अपार्टमेंट, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. शाहीन कुजंयप्पन चारतामकुढत (वय ४९, रा. आॅर्डिनन्स इस्टेट) यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी तीन महिलांसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना रेंजहिल इस्टेट परिसरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन हे खडकीतील आॅर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये मुख्य अधिकारी आहेत. ते हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी रेंजहिल इस्टेट परिसरात सर्व्हे व कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या भागातील नगरसेविकेचे पती व पुतण्याला बोलावून घेतले. आरोपींनी डॉक्टरांना तुम्ही कोरोना पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेत नाहीत. माझ्या वडिलांना काल तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात पाठविले. मग सर्व्हे करायला कशाला येता म्हणून असे म्हणून डॉक्टर व त्यांच्या सहकाºयांना शिवीगाळ केली. त्यानंतर डॉ़ शाहीन यांना हाताने मारहाण केली. डॉक्टर व त्यांचे सहकारी हॉस्पिटलकडे निघाले असताना आरोपींनी त्यांचा रस्ता अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये नगरसेवकाने गोंधळ घातल्याचा प्रकार ताजा असताना खडकीमधील हा प्रकार समोर आला आहे़ खडकी पोलिसांनी नगरसेविकेच्या पती व पुतण्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार अधिक तपास करीत आहेत.