Coronavirus: कोरोनाच्या धास्तीनं एकाच कुटुंबातील ४ जणांनी प्यायलं विष; आई-लेकाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:58 AM2022-01-10T11:58:56+5:302022-01-10T11:59:25+5:30
जोतिकाचे वडील नागराज यांचे अलीकडेच डिसेंबरमध्ये निधन झालं होतं.
मदुरै – देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनानं परत दहशत निर्माण केल्याचं चित्र दिसून येते. त्यातच तामिळनाडूमधील एका घटनेने सगळेच हादरले आहेत. याठिकाणी कोरोनाच्या धास्तीनं एका आईनं त्याच्या ३ वर्षाच्या मुलासह विष पिऊन आत्महत्या केली आहे. या महिलेचं वय २३ वर्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या कुटुंबात कोरोनाच्या भीतीने ४ जणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील जीव देणाऱ्या महिलेचा भाऊ आणि तिच्या आईचाही समावेश आहे. तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या दुर्घटनेतील २ जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. परंतु आई-लेकाचा जीव वाचू शकला नाही. मृत महिलेचे नाव जोतिका असं असून ती तिच्या पतीपासून वेगळी राहते. पीडित महिला तिच्या आई आणि भावासह माहेरीच राहत होती.
जोतिकाचे वडील नागराज यांचे अलीकडेच डिसेंबरमध्ये निधन झालं होतं. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक दबाव होता. त्यात ८ जानेवारीला जोतिका कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. ही माहिती जोतिकाने तिच्या आईला दिली. त्यामुळे ती घाबरली. त्यानंतर कोरोनाच्या दहशतीनं कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विष पिऊन कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमी अवस्थेतील कुटुंबातील सदस्यांना हॉस्पिटलला नेले. तेव्हा जोतिका आणि तिच्या मुलाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस चौकशी करत आहेत.
तामिळनाडू सरकारने केले लोकांना आवाहन
या घटनेनंतर तामिळनाडू सरकारने निवेदन जारी करत सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की, कोरोना संक्रमणामुळे कुणीही घाबरु नका. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. त्याशिवाय कोरोना संक्रमित झाला असाल तर तातडीने डॉक्टरांना आणि रुग्णालयाशी संपर्क साधा. कोरोनावर उपचार शक्य आहेत. लवकर औषधं घेणारे रुग्ण कोरोना आजारातून बरे होतात असंही सरकारने सांगितले आहे.