Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:32 PM2020-04-08T14:32:53+5:302020-04-08T14:46:58+5:30
Coronavirus : निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत.
मुंबई - देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. प्रत्येक देशात कोरोनाला आळा घालण्याची अतोनात प्रयत्न सुरू आहेत. भारताने देखील कोरोनाला अटकाव करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत, त्यापैकी 5 तबलिगीचा शोध धारावीत लागला असून धारावी पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आहे.
निजामुद्दीन, दिल्ली येथील तब्लीगी मर्कज़ मध्ये जी लोकं सामील झाले होते त्यांतील अजूनही ५०-६० जण आपला मोबाईल बंद करून लपलेले आहेत. त्यंना सूचित करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलिस स्टेशनला नोंद करून घ्यावी व त्याचबरोबर टेस्टिंग करून क्वॉवरनटाय्न मध्ये भरती व्हावे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 7, 2020
दिल्ली येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमला उपस्थित राहून देखील माहिती लपवल्याच्या आरोपाखाली 150 व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम 188, 269 व 270 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजला सभागी झालेल्या 150 व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे (क्वारंटाईन) करण्यात आले. मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामूहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील लपून बसलेल्या ५० ते ६० तबलिगीना स्वतः हून पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.