coronavirus: लॉकडाऊनमध्ये नियम मोडून काढली वरात, वरासह वऱ्हाडी पोहोचले थेट तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:38 PM2020-06-14T13:38:36+5:302020-06-14T13:41:39+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले.
मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्या देशात सध्या गंभीर रूप धारण केले आहे. त्यातही मुंबईत परिस्थिती अधिकच बिकट आहेत. मात्र तरीही अनेकांना या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही आहे. याचेच उदारहरण काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात दिसून आले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घातलेले असतानाही एका कुटुंबाने बँडबाजासह जोरात वरात काढली. याप्रकरणी वरासह अन्य काहीजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबाने पोलिसांची परवानगी न घेता वरात काढली होती. तसेच वरातीमध्ये सामील झालेल्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे मास्क, सोशल डिस्टंसिंग यांसारखे कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय केले नव्हते.
या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई केली. पोलिसांनी वर आणि ९ वऱ्हाड्यांवर कारवाई केली आहे. तसेच या वरातीसाठी वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि बँड पार्टीवरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. या वरातीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक कोरोनाचे भय विसरून सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडून नाचताना दिसत आहेत.
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे गंभीर संकट निर्माण झालेले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. तसेच शनिवारीसुद्धा राज्यामध्ये कोरोनाचे ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले होते. तर शनिवारी राज्यात ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ८३० एवढी झाली आहे.