Coronavirus : कतारहून आला; मामाने भाच्याला लपवून ठेवले, पोलिसांची गुन्हाच नोंदवला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:32 PM2020-03-25T15:32:42+5:302020-03-25T15:55:05+5:30
Coronavirus : भाच्याला त्याच्या घरी लपवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांगडा - हिमाचलच्या कांगडा येथील रैहान पोलीस ठाण्यात पोलिसांनी मामा व भाच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोनामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणं भारतात आवश्यक असून देखील मामाने कतार येथून आलेल्या भाच्याला त्याच्या घरी लपवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी कुटुंबातील सात सदस्यांनाही होम क्वारंटाइन करून ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाचा आणि त्याच्या मामाविरूद्ध फतेहपूर पोलीस चौकी रैहान येथे मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा भाचा कतारहून आला असा आरोप आहे. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना न सांगता लपून राहाण्यासाठी मामाकडे गेला. त्याचबरोबर भाच्याने रैहान आणि पठाणकोट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही.
गोलवाच्या लोकांनी ही माहिती रैहानचे वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली, तेव्हा मामा ओंकार सिंग यांनी भाच्याला तेथून पळून जाण्यास मदत केली. याची चौकशी एसडीएम फतेहपूर बलवान चंद मंढोत्रा यांनी केली आहे.
मंढोत्रा म्हणाले की, फक्त कृष्णा आणि त्याचा मामा ओंकार सिंग यांच्याविरूद्ध दोन एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओंकार सिंगच्या कुटूंबातील सात सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांना कोणाशीही संपर्क साधू नये अशी ताकीत देण्यात आली आहे.