Coronavirus: ८५० द्या अन् खासगी लॅबकडून कोरोना चाचणी करा; महापालिकेच्या देखरेखीत विमानतळावर प्रवाशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:40 PM2021-03-03T22:40:20+5:302021-03-03T22:40:52+5:30
कोरोना संसर्ग रोखण्याकरीता संसर्ग झालेल्याना शोधण्यासाठी मुंबई महापालिका अँटीजेन चाचणी सर्वत्र मोफत करत आहे
मुंबई - मुंबई महापालिका कोरोनाच्या अँटीजेन चाचण्या सर्वत्र मोफत करत असून आरटीपीसीआर चाचण्यासुद्धा महापालिका अनेक ठिकाणी विनामूल्य करत आहे. परंतु मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर मात्र महापालिका कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात रोज हजारो प्रवाशांकडून खासगी लॅब मार्फत प्रत्येकी साडे आठशे रुपये मोजून कोरोनाच्या चाचण्या करायला लावत आहे. त्यामुळे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्याकरीता संसर्ग झालेल्याना शोधण्यासाठी मुंबई महापालिका अँटीजेन चाचणी सर्वत्र मोफत करत आहे. या शिवाय महापालिकेने अनेक रुग्णालय आदी ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्यासुद्धा मोफत करून देण्याची सुविधा उलपब्ध केलेली आहे. परंतु मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना मात्र महापालिकेचे कर्मचारी तेथे तैनात असलेल्या खासगी लाईफनीटी वेलनेस इंटरनेशनल लिमिटेड ह्या लॅब करून सक्तीची चाचणी करून घेण्यासाठी भाग पाडत आहेत. विमानतळावर येणाऱ्या मुंबईसह अन्य राज्यातील नागरिकांना सुद्धा बळजबरीने ८५० रुपये भरून चाचणी करण्यास भाग पडले जात आहे.
विमानतळावर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा कोरोना चाचणी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केली जात आहे. त्यामुळे विमानतळावर उपस्थित असणाऱ्या खासगी लॅबकडूनच तुम्हाला चाचणी करून घ्यावी लागेल अन्यथा बाहेर सोडणार नाही असे थेट धमकावले जाते. येथे पालिकेचे कर्मचारी आदी तैनात केलेले आहेत. ८५० रुपये चाचणी साठी देण्यास प्रवाशी इच्छुक नसले तरी नाईलाजाने अडवून ठेऊ नये म्हणून प्रवासी पैसे भरून चाचण्या करून घेत आहेत. मुंबई विमानतळावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
प्रवासी चाचणी करून घेण्यास तयार असले तरी त्यासाठी खासगी लॅबला ८५० रुपये का भरावे ? असा प्रश्न उपस्थित करून महापालिका किंवा शासनानेच मोफत तपासणी ठेवावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. रेल्वे, बस, खासगी वाहनाने रोजचे हजारो लोक मुंबई व राज्यात ये- जा करत आहेत त्यांच्या कोरोना चाचणी केल्या जात नाहीत, पण कोरोना फक्त देशांतर्गत विमानातील प्रवाशांमुळेच येणार आहे का? असा संताप व्यक्त करत प्रवाशांनी महापालिका आणि राज्य सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही .