Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:27 PM2021-04-22T19:27:02+5:302021-04-22T19:27:45+5:30

Coronavirus : यावेळी महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-१९ या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ इसमांचे रिपोर्ट मिळून आले.

Coronavirus: Coronavirus pathology lab exposing fake report; Four arrested, including owner | Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक 

Coronavirus : कोरोनाचे बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश; मालकासह चौघांना अटक 

Next
ठळक मुद्देतपासणीकरीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोवीड-१९ चा निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट रिपोर्ट देताना महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरी मधील तीन इसमांना रंगेहात पकडले.

नितिन पंडीत

भिवंडी - शहरातील कोरोना रुग्णांचे बनावट पोसिटिव्ह व निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून अवघ्या ५०० रुपयात विकणाऱ्या पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह एकूण चौघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून गुरुवारी गुन्हे शाखेने सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात माहिती दिली आहे.  

             

भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांना गोपनीय माहीती प्राप्त झाली होती की, भिवंडी शहरातील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी न करता कोरोनाचे निगेटीव्ह तसेच पॉझीटीव्ह बनावट रिपोर्ट ५०० रुपये दराने बनवून दिला जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लागताच मंगळवारी भिवंडी युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच भिवंडी मनपाचे वैदयकिय अधिकारी यांनी मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोर असलेल्या महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे पोलीसांनी डमी व्यक्ती कोवीड-१९ चे निगेटीव्ह रिपोर्ट घेण्याकामी पाठविले असता आरटीपीसीआर तपासणीकरीता कोणताही स्वॅब अथवा सॅम्पल न घेता कोवीड-१९ चा निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून बनावट रिपोर्ट देताना महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरी मधील तीन इसमांना रंगेहात पकडले.

               

यावेळी महेफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-१९ या साथीच्या आजाराचे आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ इसमांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटीव्ह व ५ रिपोर्ट हे पॉझीटीव्ह मिळून आले असून या बनावट रिपोर्ट बनविल्या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खान यांचे कडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचे ६४ इसमांचे कोवीड- १९ आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हे लॅब मध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटर च्या सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याचे कबुली दिली.

               

त्यांच्याकडे पोलिसांनी कसुन विचारपुस केली असता माहीती मिळाली की, भिवंडी शहरातुन परराज्यामध्ये जाण्यासाठी विमानाने, रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि विविध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोवीड-१९ या साथीच्या आजाराची आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हा निगेटीव्ह असणे बंधनकारक असल्याने सदर इसमांना प्रत्येक रिपोर्ट हा कमीत कमी ५०० रुपये एवढ्या दराने बनावट रित्या थायरोकेअर या पॅथॉलॉजीच्या लेटरहेडवर तयार केलेले आहेत. तसेच, यापुर्वी सुध्दा अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवुन दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट हे मेहफुज क्लीनिकल लॅबरोटरीचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार केलेले व लोकांना दिलेले असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे कलम ४२०,४६५,४६८, ४७१, २६९,२७०, ३४ सह कोवीड – १९ उपाययोजना सन् २०२० नियम ११ प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. 

                 

या गुन्ह्यात इनामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद ( वय ३१ , रा. भिवंडी ) अफताब आलम मुजीबुल्ला खान ( वय २२ रा. पिराणीपाडा ) व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख ( वय २० वर्षे रा. शांतीनगर ) या तिघांना बुधवारी अटक करण्यात आली असुन या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या बनावट रिपोर्ट प्रकरणी चौथा आरोपी मेहफुज आलम मुजीबुल्ला खान ( वय २९ वर्षे रा. भिवंडी ) यास गुरुवारी अटक करण्यात आलेली आहे.

             

या गुन्हयाच्या तपासात सदर लॅबमधुन कोवीड १९ आरटीपीसीआर तपासणीचे ६४ रिपोर्ट, त्याचप्रमाणे आरोपींनी पडघा परिसरातील कोशींबी येथील साईधारा कम्पांऊड मधील वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेले एकूण ५८९ स्वब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आय. सी. एम. आर.चे फॉर्म हे लॅबमध्ये मिळून आलेले आहेत. तसेच यापुर्वी अनेक कंपन्यातील मोठ्या प्रमाणात कामगारांचे आरटीपीसीआर तपासणीचे बनावट रिपोर्ट तयार करून विक्री केले असल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली असून पोलिसांनी भिवंडी मनपा यांच्याकडुन माहीती घेतली असता सदर मेहफुज क्लीनिकल लॅबोरेटरी यांना आय.सी.एम.आर. कडुन किंवा शासनाकडुन कोवीड –१९ या साथीच्या आजाराबाबत आरटीपीसीआर तपासणी करण्याची कोणत्याही प्रकाराची परवानगी दिलेली नसल्याची माहिती देखील समोर आली असून अधिक तपास भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. 

           

भिवंडी गुन्हे शाखेत आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी, भिवंडी गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने , गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Coronavirus: Coronavirus pathology lab exposing fake report; Four arrested, including owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.