Coronavirus: सुरक्षा किट मागितल्याने डॉक्टरची परिचारिकेला धमकी; व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:29 AM2020-05-08T04:29:15+5:302020-05-08T04:29:25+5:30
डॉक्टर व परिचारिका गणेश पेठेतील एका खासगी रुग्णालयातील आहेत.
पुणे : खासगी रुग्णालयातील परिचारिकेने सुरक्षा किटची मागणी केली म्हणून डॉक्टरांनी तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम्ही काम करायला तयार आहे, पण किट द्या, अशी विनवणी करताना ही परिचारिका दिसत आहे.
डॉक्टर व परिचारिका गणेश पेठेतील एका खासगी रुग्णालयातील आहेत. या भागातही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. डॉक्टरांकडून तिला अर्वाच्य भाषेत शस्त्रक्रिया विभागातील गाऊन आणि मास्क घालूनच काम करावे लागेल, असे सांगितल्याचे दिसत आहे. हे मान्य नसेल, तर दिलेली रूम रिकामी करून गावाकडे जा, घरच्यांचे ऐकायचे असेल तर धुणीभांडी करा, अशी धमकीही डॉक्टरांनी दिल्याचे दिसते.
कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांशी संपर्कात येणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालणे आवश्यक आहे. इतरही सूचना दिल्या आहेत. - डॉ. आरती निमकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे