Coronavirus Lockdown : राज्यभरात २१ दिवसांत २६ हजार वाहने जप्त, १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:13 PM2020-04-13T21:13:20+5:302020-04-13T21:20:10+5:30
Coronavirus Lockdown : सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत.
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड़ सुरु असताना गेल्या २१ दिवसांत २६ हजार ७४७ वाहने जप्त करण्यात आली आहे. तर १ कोटी ४३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या दफ्तरी तब्बल ४० हजार २४२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात पुणे शहर(५१७८), सोलापूर शहर(३१९८ ), अहमदनगर(३७३९), पिंपरी चिंचवड (३२८४) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. याच काळात राज्यभरात ५०९ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’च्या आदेश धुडकावले. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले.
याच काळात अवैध वाहतूक प्रकरणी ९६८ गुन्हे नोंदविण्यात आले असून ३०९६ जणांना अटक करण्यात आली. याच काळात २६ हजार ७४७ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. नागरिक विनाकारण बाहेर पड़त असल्याने पोलिसांना कठोर पावले उचलावी लागत आहेत. तर पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ६५ हजार ५४५ तक्रारी समोर आल्या. यातील बहुतांश तक्रारी या कोरोना संशयित तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी संदर्भातील आहेत.
मुंबईत ५ हजार गुन्हे
मुंबईत २० मार्च ते १२ मार्च पर्यन्त ५ हजार ३२१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविन्यात आले असून २१५ जणांना अटक करत त्यांना जामिनावर सोडण्यात आले. तर ६६ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहेत.
सोसायटयामध्येही गस्त वाढवली
मुंबईत अनेक सोसायटयांमध्ये रात्रीच्या सुमारास गप्पाच्या मैफ़ीली भरत असल्याचे चित्र आहे. अशात पोलिसांनी अशा सोसायटयामध्येही गस्त वाढवली आहे. त्यामुळे पोलिसांची गाड़ी येताच अनेकांची पळापळ होत असल्याचे पहावयास मिळते आहे.